मराठी भाषिक असल्याचा अभिमान जागृत ठेवा — डॉ. रवींद्र शोभणे
नावेद पठाण मुख्य संपादक
महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचा अभिजात मराठी भाषा सप्ताह
वर्धा : मराठी भाषा ही अत्यंत प्राचीन असून तिची ज्ञानपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध आहे. आजच्या ज्ञानविज्ञानाच्या युगात, मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून जगातील ज्ञानवृद्धीची संकल्पना प्रत्यक्ष लिखित स्वरूपात कार्यान्वित केली जात आहे. मराठी भाषिक समाजाने आपल्या भाषेबद्दलचा अभिमान जपला पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी केले.
अंमळनेर येथे भरलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ व यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महिला अभ्यास केंद्राचे सहायक प्राध्यापक डॉ. भगवान फाळके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद नारायणे आणि विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी गोहणे उपस्थित होते.
डॉ. शोभणे पुढे म्हणाले की, मराठी विश्वकोश निर्मिती हा अत्यंत व्यापक आणि सातत्याने सुरू राहणारा प्रकल्प आहे. मराठी भाषेतून ज्ञानाचा प्रसार करण्याचे हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. या ज्ञानयज्ञात विद्यार्थ्यांनी आणि समाजाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना समीर देशमुख म्हणाले की, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था १९५९ पासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून ज्ञानप्रसार आणि सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवण्यात येत आहे.
प्रमुख अतिथी डॉ. भगवान फाळके यांनी मराठी भाषेचा प्राचीन वारसा आणि आधुनिक काळातील स्थिती यावर सखोल विवेचन केले. प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांनी मराठी विश्वकोशाच्या कार्याची व्यापकता आणि मराठी जनमानसातील त्याची उपयुक्तता स्पष्ट केली.
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष झाल्याबद्दल डॉ. रवींद्र शोभणे आणि प्रमुख वक्ते डॉ. भगवान फाळके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. शोभणे यांनी महाविद्यालयाला मराठी विश्वकोशाचे खंड भेट दिले.
डॉ. प्रमोद नारायणे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमात डॉ. रवींद्र बेले, डॉ. नरेश कवाडे, प्रा. एकनाथ मुरकुटे, डॉ. योगिता ठाकरे, डॉ. आरती चौधरी, डॉ. सरिता विश्वकर्मा, डॉ. अर्चना दुपारे, डॉ. बुद्धघोष लोहकरे, प्रा. अरुणा हरले, डॉ. संदीप चव्हाण, डॉ. प्रतिभा काटकर, प्रा. संदीप रायबोले आणि डॉ. दीपक महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राखी राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैष्णवी गोहणे हिने मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, विद्याव्यासंगी सहायक डॉ. स्नेहा दिलीप खोब्रागडे, हिंदी विभागप्रमुख डॉ. संजय धोटे, रियाज शेख आणि प्रदीप चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.